सांगली न्यूज
1/10/2024
वर्षातले सगळे दिवस सारखे असतात.पण गावाकडले काही दिवस मोक्कार भारी असतात बर…त्यातलेच हे काही.
पित्तरपाट संपून घटस्थापना जसजशी जवळ यायला लागते.तस तशी घरातल्या बाया-माणसाची घर आवरायची लगबग सुरू होते.ठेवणीच्या कपड्यासहित,वापर नसणारे जुने पितळाचे भांडे सगळं काही बाहेर काढलं जायचं.कपाट आवरता आवरता जुना निकाल,जुने फोटू सापडायचे.ते बघतानी टायमाच पण ध्यान नसायच..महत्वाच म्हणजे वर्षभर न सापडणारी एखादी वस्तू मिळायची मग काय नुसता आनंदी आनंद.
एकदा मला माझाच हरवलेला १२ रूपायाचा “रबरी MRF चा बॉल “ सापडला होता…बॉल मिळाल्याचा आनंद एवढा मोठा की त्याची तुलना आता कशाशीश नाही होत.
मग काय पोर गोळा करून अंधार पडूस्तवर येड्यावाणी खेळायचो. कधी बॅटखाली तर कधी पाठीवर नंबर पाडून,
जास्त पोर असले तर गडी वाटून वाटायची पद्धत पण एवढी भारी ना…कौतुक वाटतं मलाच त्या बालपणाच
दोघानी एकमेकाच्या गळ्यात हात घालून कोणाला आवाज नाही येणार इतक्या लांब जाऊन एकमेकांचे नाव ठेवायचे…
“हत्ती-घोडा ,सचिन-कपिल,शाहरूक-सलमान ,चिंच-बोर “ अजून बरच काही मग कॅप्टन ला विचारायचं काय घेणार चिंच - बोर मग ज्याच नाव घेतलं त्याच्या नावावरून विनोद ,किस्से घडायचे..शेवटी खेळ सुरू व्हायचा
ज्याची बॅट त्याचं नाटक सहन करीत..एकमेकाना चीडी लावत ..भांडण करत खेळ कधी पुर्ण तर अर्द्यावरच सोडावा लागायचा…
मज्जा तर तव्हा यायची एखाद्याला बॅटींग केल्यावर घरचे बोलायला यायचे.त्याला परत कधीच खेळायला नाही घ्यायचे ,आणि घेतलं तर बॅटिंग शेवटी द्यायची ….यावर एकमत होऊन सगळे घरी जायचे….
ज्या बॅट-बॉल शिवाय आयुषातला एकही दिवस जात नव्हता…जाईल अस कधी वाटलं पण नव्हत..त्याच्या शिवाय कित्येक वर्ष मी राहिलो कसा याचच मला नवल वाटतं..असो …
आता घरच्यांसोबत तळ्याव आलतो..गोधड्या धोयला.आठवलं म्हणून लिहिलं…