सांगली न्यूज नेटवर्क
कवठे महांकाळ: शहरातील यशवंत नगर जवळ देशिंग रोडला सोमवारी दिनांक १ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजणेच्या सुमारास झालेल्या बस आणि दुचाकी अपघातात मरण पावलेले आणि सध्या सैन्यदलात कार्यरत असलेले विशाल संजय तेली ( वय ३२) यांच्यावर आज दिनांक २ जुलै रोजी सकाळी त्यांच्या कवठे महांकाळ येथील निवासस्थानाजवळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमांडंट द मराठा लाईट एनफंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावचे सुभेदार शेख हाटल पीरा,हवालदार आप्पासाहेब मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने अंतिम बिगुल वाजवून विशाल तेली यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.सेवानिवृत्त मानद कॅप्टन आणि केरेवाडीचे सरपंच श्रीकृष्ण पाटील,कवठे महांकाळ नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सिंधुताई गावडे,नायब तहसिलदार पवार,पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशाल तेली यांचे अंत्यदर्शन घेतले.यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथील अधिकारी अनिल राजाराम जवळेकर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून तेली यांना आदरांजली वाहिली.
सैन्य दलात कार्यरत असलेले विशाल तेली काही दिवसांसाठी सुट्टीवर आले होते.त्यांच्या पश्चात आई,वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.यावेळी कुटुंबांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे मन हेलकावून गेले होते.अनेकांच्या अश्रूंना बांध फुटला होता.विशाल तेली यांना अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न आणि शोकाकुल झाले होते.कवठे महांकाळ शहरातील तसेच परिसरातील लोकांनी हजारोंची गर्दी करत साश्रूपूर्ण नयनांनी विशाल यांना अखेरचा निरोप दिला.