घाटनांद्रे/वार्ताहर :-जालिंदर शिंदे
उन्हातान्हात राबून जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य मजूर व लाभार्थ्यांच्या बोटाच ठसेच काहीवेळा स्वस्त धान्यदुकानातील पॉज मशीनवर उमटत नसल्याने त्यांना विनाकारण धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.तर कालबाह्य झालेल्या पॉज मशिनीही बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.त्या मशीनच बदला किंवा यावर इतर तात्काळ पर्याय निर्माण करा अन्यथा नाविलाजास्तव तीव्र आंदोलन छेडावे लागेल आसा खणखणीत इशारा तालुका भाजपाचे सरचिटणीस तथा तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कुमार पाटील यांनी दिला असून याबाबत आपण लवकरच संबंधित विभागाला निवेदन देणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.
याबाबत बोलताना पाटील पुढे म्हणाले की तालुक्यातील अनेक गावांत स्वस्त धान्य दुकाने आहेत.या दुकानांतून धान्य घेणाऱ्या गरजू लाभार्थ्यांची संख्याही मोठी आहे.मात्र अनेक वयोवृद्ध तसेच मजुरीची कामे करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे पॉज मशीनवर उमटत नाहीत.याशिवाय अनेक कुटुंबातील लाभार्थी (वयोवृद्ध वगळता इतर) तरुण उदरनिर्वाहासाठी अन्यत्र भटकंती करत असल्याने धान्य घेण्यासाठी या वयोवृद्धांना जावे लागते.मात्र त्यांच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत तसेच त्यांच्या जवळ आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल नसल्याने धान्य मिळणे मोठे कठीण बनले आहे.
याशिवाय स्वस्त धान्य दुकानात सध्या असणाऱ्या पॉज मशीनही कालबाह्य झाल्या आहेत.अनेक मशिनींच्या बॅटरीज चार्जिंग होत नसल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला की या मशीनस बंद पडत आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांबरोबरच दुकानदारांनाही ताटकळत बसावे लागत आहे. ठराविक मुदतीत धान्य लाभार्थ्यांने न्यावे ही प्रशासनाची अपेक्षा असते मात्र अशा प्रकारच्या पॉज मशीनमुळे दिरंगाई होते आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन मशीन त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
चौकट :१) ज्यांचे बोटाचे ठसे उमटत नाहीत अशा लाभार्थ्यांच्या मोबाईल वर ओटीपी च्या माध्यमातून धान्य वितरण करण्याची सुविधा आहे.परंतु वयोवृद्ध व मजूर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल नाहीत.तर अनेकांनी केवळ गरजेपोटी कोणाचे तरी मोबाईल लिंक केले होते.तो कोणाचा नंबर होता हेही माहिती नसल्याने ओटीपी कोठे जाणार?आणि त्याचा नंबर कोण सांगणार ? त्यामुळे अनेकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.पुरवठा विभागाने यात लक्ष घालून संबंधित लाभार्थ्यांना धान्य मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही प्रफुल्लकुमार पाटील यांनी केली आहे.
२) जुन्या पॉज मशीन सन २०१८ पासून कार्यरत आहेत.चार वर्षांनी या मशिन बदलण्याची गरज होती.जुन्या मशीन बदलून नव्या देण्यासाठी नवीन मशीन तालुका पुरवठा विभागाकडे अनेक दिवसांपूर्वी मिळाल्या असल्याचे समजते.मात्र त्या दुकानदारांना कधी मिळणार ? हाही प्रश्नच आहे असे पाटील यांचे म्हणणे आहे.