yuva MAharashtra राजकारणातला बाप माणूस !

राजकारणातला बाप माणूस !

Admin
0




सांगली न्यूज डिजिटल 


२००२ सालचा तो भिषण दुष्काळ आठवला की आजही माझ्या अंगावर शहारे उभा राहतात .
आमच्या खंडेराजुरी गांवचा एक भाग असलेल्या गवळीवाडीत कित्येक गायी चारा आणि पाण्याअभावी तडफडून मेल्या होत्या . ते भायन दृष्य बघून बातमी लिहिताना माझे हात थरथर कापत होते . त्यावेळी बाळासाहेब पाटील खंडेराजुरीकर यांनी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याशी हूज्जत घालुन खास बाब म्हणून खंडेराजुरीत ब्रम्हनाथ मंदिरासमोर सुमारे १२०० जनावरांची चारा छावणी सुरु केली . सांगलीच्या वसंतराव दादा कारखाण्याने चालविलेल्या या चारा छावणीत कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी आणि खंडेराजुरी परिसरातील पाच गांवची जनावरे दाखल होती .
 त्याचं काळात महांकाली साखर कारखान्यचे अध्यक्ष विजय (अण्णा) सगरे यांनी २० जुलै
 २००२ रोजी कारखान्यासह पाच ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरू केल्या आणि सुमारे २५ हजार मुक्या जनावरांचे पुण्य पदरी बांधून घेतले. या चारा छावण्यांचे नियोजन विजय अण्णा यांचे स्वीय सहाय्यक आणि आमचे वर्गमित्र संजय (अण्णा ) सुंगारे हे करायचे .
एक वेळ तर अशी बिकट परिस्थीती आली की छावणीतील जनावरांना पाणी मिळणे मुश्कील झाले . त्यावेळी संजय (अण्णा) सुंगारे यांनी सुभाषनगर (मालगाव) येथील लिफ्ट इरिगेशनचे पाणी टॅंकरने कवठेमहांकाळला नेऊन जनावरांची तहान भागवली . कवठेमहांकाळ तालुक्यातील रायेवाडी तलावातील पाण्याचाही जनावरांच्या साठी वापर करण्यात आला . पायाला दुखापत झाली असतानाही विजय अण्णा सगरे रोज सकाळी या पाच चारा छावण्यांना स्वतः भेटी देऊन जातीने परिस्थीतीवर लक्ष ठेवायचे या चारा छावण्या तब्बल ११ महिने चालल्या .



 याच कालावधीत विदर्भातील अनुशेषाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि तत्कालीन राज्यपाल डॉ.महंमद फजल यांनी महाराष्ट्रात समान निधी वाटपाचा बडगा उचलला . म्हैसाळ पाणी योजनांसाठी निधीची कमतरता भासू लागली त्यावेळी अर्थमंत्री जयंतराव पाटील आणि पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी कॅबिनेटमध्ये हा मुद्दा लावून धरला .मिरज पूर्व भाग आणि कवठेमहांकाळ,जत, आटपाडी, तालुक्यातील दुष्काळाची भिषणता नजरेत आणून देण्यासाठी जयंतराव पाटील यांनी राज्यपाल फजल यांचा दौरा आयोजित केला . तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर आर पाटील , उद्योग मंत्री डॉ.पतंगराव कदम , अजितराव घोरपडे हे कवठेमहांकाळ तालुक्यातील चारा छावण्याला भेटी देण्यासाठी राज्यपालांच्या दौ-यात सामील झाले . दस्तुरखुद्द जयंतराव पाटील यांनी त्या दौ-यात राज्यपालांच्या चारचाकी गाडीचं ड्रायव्हिंग केलं . राज्यपाल फजल हे महांकाली कारखान्याच्या चारा छावणीत आल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधाळ आडनावाच्या शेतकऱ्याने अक्षरशः हंबरडा फोडत दुष्काळाची भीषणता राज्यपालांच्या समोर कथन केली .काळीज पिळवटून टाकणारे ते दृश्य बघून राज्यपाल फजल यांनी कृष्णा खो-यासाठी तात्काळ निधी मंजूर केला .
याच काळात शेजारचा सांगोला तालुकासुध्दा दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत होता . तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यात सुमारे ३५ हजार जनावरांची चारा छावणी सुरू केली . शासन या चारा छावणीतील लहान जनावरांना १७ रुपये आणि मोठ्या जनावरांना प्रत्येकी ३४ रुपये अनुदान द्यायचं. गणपतराव आबांनी एका जनावराला किती चारा पाण्याचा खर्च येतो याचा सखोल अभ्यास केला .अभ्यासाअंती प्रत्येक मोठ्या जनावरांना २४ रुपये खर्च येत असल्याचे लक्षात येताच गणपतराव आबांनी वरचे १० रुपये शासनाला परत पाठवले . त्या काळात इतर छावणीवाल्यांसारखं चांदी करून घेता येत होतं पण मुक्या जनावरांचा जिव या सत्यवादी आमदाराने मोलाचा मानला . ज्यांना द्राक्षबागेत कामालाही कोण घेत नव्हतं अशा मिरज पूर्व भागातील गावटग्यांनी याच काळात चारा छावणीतल्या मुक जनावरांच्या तोंडातला घास खाल्ला आणि टोलेजंग बंगले बांधून ,दुकानं थाटून निर्लज्जपणे गांवात नेते म्हणून मिरवायला लागले पण गणपतराव आबांनी आमदार असताना सुद्धा दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत कार्यालय थाटून फक्त एक टेबल,एक खुर्ची आणि एका लॅंडलाईन फोनवर आमदारकीचा कारभार केला . पुरेसा निधी मिळत नसल्याची बतावणी करुन रात्रीत १७ पक्ष बदलणारे आजकालचे टिनपाट आमदार कुठं आणि गणपतराव आबा देशमुखांच्या सारखा धेय्यवादी आमदार कुठं ? 


 कृष्णा खो-याच्या समान पाणी वाटपासाठी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या खांद्याला खांदा लावून गणपतराव आबा देशमुख लढले . त्याच्याही आधी गणपतराव आबांनी उजनी धरणातून पाणी उचलून सांगोलेकरांची पिण्याच्या पाण्याची कुतरओढ थांबवली .
 गणपतराव आबा देशमुख यांनी आमदारकीच्या १३ निवडणुकांपैकी फक्त दोन निवडणुकीत हार पत्करली .एका तर आमदारकीच्या निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांचा केवळ १९२ मतांनी काठावर विजय झाला . कार्यकर्त्यांनी फेर मतमोजणीचा गणपतराव आबा यांच्याकडे आग्रह धरला .
त्यावेळी गणपतराव आबा नम्रपणे म्हणाले,
जनतेने शहाजी बापुंच्या बाजुने कौल दिलाय तो आपण मान्य करायचा .जनादेशाचा अनादर करायचा नाही '
.आजकालच्या बाप आणि काका पळवून नेण्याच्या पळवापळवीच्या राजकारणाच्या जमाण्यात गणपतराव आबा देशमुख बाप माणूसच म्हणायचा 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top