सांगली न्यूज
पाऊस आणि लाईट यांचं वेगळच नात आहे.पावसाला सुरुवात झाली,आकाशात वीजा कडाडल्या की इकडे लाईट गेलीच म्हणून समजा.अनेकदा वादळी वाऱ्यामुळे तारा तुटणे, डीपी जळणे,खांब पडणे किंवा इतर कारणास्तव वीजप्रवाह खंडित होत असतो.राज्यात विविध भागात गेल्या दोन,तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.या पावसामुळे जनजीवन काही ठिकाणी विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत देखील आपले कर्तव्य बजावण्यासाठी वायरमन झटत असताना दिसत आहेत.
कवठे महांकाळ तालुक्यातील रांजणी मधील ११ केव्ही लोणारवाडी विभागाची उच्चदाब विद्युतवाहिनी अग्रणी नदीमध्ये तुटून पडली होती.दिनांक १४ जुलै रोजी रविवारी मुसळधार पाऊस सुरू असताना आणि अग्रणी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली असताना देखील रांजणीचे विद्युत सहायक संतोष खोत यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीमध्ये पोहत जाऊन पाण्यात तुटून पडलेली विद्युत वाहिनी ओढून नदी पात्राच्या बाहेर काढून जोडण्याचे धाडसी कार्य केले.यावेळी ऋषिकेश पवार,विश्वास भोसले हे इतर कर्मचारी त्यांच्या मदतीला उपस्थित होते.
वारंवार खंडित होणारी वीज,भरमसाठ येणारी बिले,धोकादायक खांब आदी विविध कारणांमुळे वीजवितरण विभागाला सर्वसामान्यांच्या रोषाला नेहमीच सामोरे जावे लागते परंतु वीजपुरवठा सुरू करण्याची आपली जबाबदारी या जाणिवेने आणि कर्तव्यपालनाच्या भावनेतून संतोष खोत,विश्वास भोसले,ऋषिकेश पवार यांच्या सोबत कवठे महांकाळ विभागातील निखिल पाटील व त्यांचे सहकारी स्वतःचे आयुष्य काळोखात लोटून इतरांच्या आयुष्यात उजेड आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात.त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ कार्याचे तालुक्यात कौतुक होताना दिसत आहे.